भारतीय इतिहासातील मध्ययुग हे इस्लामच्या वर्चस्वाचे आणि हिंदू मनाला शतकानुशतके वेदना देणारे होते. या काळात, ताठ मानेने उभे राहून, ज्याची रोमहर्षक जयगाथा उल्लासाने घोषित करावी असे एकमेव तेजोमय स्थळ होते, ते म्हणजे ‘शिवाजी’. या ऐतिहासिक नवलाईचे सखोल अवलोकन करून, त्यामागील रहस्य उलगडून दाखवणारा नरहर कुरुंदकरांचा ‘युगप्रवर्तक छत्रपती’ हा ग्रंथ म्हणजे केवळ एक पुस्तक नाही, तर तो एका ज्वलंत नेतृत्वाचा अभ्यास आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व म्हणजे जनतेत प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या एका चारित्र्यवान युगप्रवर्तक नेत्याचा अभ्यास होय. शिवचरित्रातील जयगाथांची मालिका, वादस्थळे, इतिहास लेखनाचे विविध प्रवाह, बलिदानाची सांस्कृतिक प्रेरणा आणि जनतेची ध्येयवेडी निष्ठा अशा अनेक विषयांचा या ग्रंथात कुरुंदकरांनी सखोल परामर्श घेतला आहे. नरहर कुरुंदकरांचे हे दुर्मिळ आणि विचारप्रवर्तक लेख एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देणारा हा ग्रंथ, इतिहासाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देतो.



